जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२३ । चांद्रयान 3 च्या दिव्य यशानंतर सामान्य भारतीयांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो बद्दल मोठ्या प्रमाणात कुतुहल निर्माण झाले आहे. यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 61 विद्यार्थ्यांनी नुकतीच भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला भेट दिली. नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे दरवर्षी महाराष्ट्रात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन केले जाते.
यातील गुणवंत विद्यार्थ्यांना (इस्रो), विक्रम साराभाई स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर, सायन सिटी यासारख्या उच्च तंत्रज्ञान संस्थांना विनामूल्य भेटीसाठी नेले जाते. सन 2022 मध्ये या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या महाराष्ट्रातील 61 विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा नुकताच संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या इस्रो दौऱ्याचे हे सातवे पर्व होते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी या प्रकारची चळवळ राबवणारी नोबेल फाउंडेशन ही एकमेव संस्था आहे. या तीन दिवशी अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी विक्रम साराभाई स्पेस एप्लीकेशन सेंटर येथे उपग्रह बनविण्याच्या पद्धती, उपग्रहांचे प्रकार रॉकेटचे प्रकार, उपग्रह पाठवण्यासाठी रॉकेटच्या इंधनांचा अभ्यास मंगळयान, चंद्रयान तसेच भविष्यात आखणी केलेल्या गगनयान संदर्भात संपूर्ण मॉडेल्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला.
तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर येथे क्रिएटिव्ह कोअर लर्निंग या व्यासपीठावर आयआयटीच्या तज्ञ प्राध्यापकांकडून माहिती घेतली. आयआयटी गांधीनगरच्या अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्रंथालयाचा देखील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. अहमदाबाद येथील सायन्स सिटी मध्ये विद्यार्थ्यांनी आशिया खंडातील एक प्रगत रोबोटिक लॅबोरेटरी रोबोटिक पार्कस मध्ये रोबोट तर्फे होणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यपद्धतीचा प्रात्यक्षिकांसह अभ्यास समजून घेतला. वैद्यकीय क्षेत्रात रोबोट तर्फे होणारे शस्त्रक्रिया, कृषी क्षेत्रात रोबोटची भविष्यात होणारी मदत,अंतराळ क्षेत्रात अंतराळयान दुरुस्तीसाठी रोबोटची होणारी मदत यासारख्या गोष्टींचा समावेश होता. यासह भारतातील अद्ययावत तंत्रज्ञान आधारित मत्स्यालय व स्पेस पार्क ला भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कबचौ उमविचे मुख्य वित्त अधिकारी रवींद्र पाटील,शिक्षिका शिल्पा फल्ले, शीला पाटील ,आरती पाटील उपस्थित होते.
सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी,सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक आयएएस राजेश पाटील, शिक्षणाधिकारी विकास पाटील, लेखिका दीपा देशमुख, महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया आदींनी अभिनंदन केले. इस्रो विज्ञान अभ्यास दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी माजी प्र कुलगुरू प्रमोद माहुलीकर,एनएमआरडीए चे उपसंचालक कपिल पवार दिलीप टाटिया ,राज्यकर अधिकारी तुषार भदाने उद्योजक संतोष भोसले आदींनी सहकार्य केले. तर यशस्वीतेसाठी नोबल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे राज्य समन्वयक अमोल पवार, राजेंद्र पाटील सुनील पाटील आदींनी परिश्रम घेतले