जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२३। गेल्या महिन्याभरापासून राज्यात पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आलीय. पाऊस कधी परतेल याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्यात पावसासंदर्भात हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांनाही दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या पुणे हवामान केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणातील ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
सप्टेंबर महिना उजाडल्यानंतर राज्यात पुरेसा पाऊस नाही. अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. परंतु आता परिस्थिती बदलणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे पाच सप्टेंबरपासून उत्तरपूर्व भारत, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होणार आहे. ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान कोकणातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.