⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | आरोग्य | धक्कादायक : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे यावल तालुक्यात महिलेचा मृत्यू

धक्कादायक : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे यावल तालुक्यात महिलेचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ३० ऑगस्ट २०२३ | ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक बोगस डॉक्टर सर्रास उपचार करतात, हे आता लपून राहिलेले नाही. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना हे बोगस डॉक्टर आदिवासी, गोरगरीब जनतेच्या जिवाशी खेळत आहेत. अशाच एका मुन्नाभाई डॉक्टराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावल तालुक्यातील कोरपावली गावात बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

यावल तालुक्यातील कोरपावली येथे बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे ४० वर्षीय आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर ‘मुन्नाभाई’ डॉक्टर गावातून पसार झाल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, कोरपावली गावात गेल्या तीन ते चार वर्षांपासून विद्युत राय या बंगाली कथित डॉक्टरने आपला दवाखाना उघडला होता. या बोगस डॉक्टरविरुद्ध अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. तरीही या बोगस डॉक्टराचा दवाखाना राजरोसपणे सुरूच होता. याच बोगस डॉक्टरमुळे एका महिलेस प्राण गमवावा लागला आहे.

उपचार सुरू असताना चुकीच्या पद्धतीने महिलेस इंजेक्शन दिले गेल्याने तिच्या पायावर विपरीत परिणाम झाले. तिला याचा खूप त्रास होऊ लागला. दरम्यान, मोठी चुक झाल्याचे लक्षात आल्याने संबंधित मुन्नाभाई डॉक्टराने काही दिवसांपूर्वीच पळ काढला होता. तर, या आदिवासी महिलेचा आज मृत्यू झाला. या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यातील बोगस डॉक्टारांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांकडून रुग्णाच्या जिवाचे बरेवाईट होण्याचा धोका असतो. बोगस डॉक्टरांकडून रुग्णाला आजार बळावल्यावर शहरातील लागेबांधे असलेल्या अधिकृत रुग्णालयाकडे पाठवून पद्धतशीरपणे आर्थिक लूट केली जाते. गुन्हे दाखल झालेले बोगस डॉक्टर जामिनावर बाहेर येताच पुन्हा व्यवसाय सुरु करतात. यामुळे बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे झाले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह