⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | बार मालकाला वरिष्ठ साहेबांच्या नावाने धमकावत असल्याची क्लिप सोशल मीडियात व्हायरल

बार मालकाला वरिष्ठ साहेबांच्या नावाने धमकावत असल्याची क्लिप सोशल मीडियात व्हायरल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३। एकीकडे जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली असतांना दुसरीकडे शहरातील एका बार मालकाला वरिष्ठ साहेबांच्या नावाने धमकावत असल्याची क्लिप सोशल मीडियात फिरू लागल्याने चर्चेला उधाण आले आहे.

जिल्ह्यात सर्वत्र अवैध दारूचे मोठ्या प्रमाणात पेव फुटल्याचे दिसून येत आहे. यावरून अगदी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ठिकठिकाणी पाऊचमधून दारू विकली जात असून या माध्यमातून अनेकांचा बळी गेल्याचे जाहीरपणे सांगितले आहे.

यामुळे गावठीच्या विरोधात व्यापक मोहिम आखण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले होते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खमकेपणाने अवैध दारूविक्रीच्या विरोधात ‘वॉश आऊट’ मोहिम उघडली आहे. त्यांनी राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी गावठच्या अड्डयांवर छापे टाकून हजार लिटरच्या वर हातभट्टी नष्ट केली आहे. या कारवाईचे स्वागत होत असून ते साहजीकच आहे.

दरम्यान, एकीकडे गावठीला चाप लागत असल्याचे सुखद चित्र असले तर दुसरीकडे अधिकृतपणे मद्यविक्री करणार्‍यांना मात्र त्रास दिला जात असल्याची चर्चा आहे. यातच एका बार मालकाला एका त्रयस्थाने ( जो खात्याचा कर्मचारी असून हप्ते वसुलीचे काम करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे! ) थेट त्याच्या काऊंटरवर जाऊन दरमहा चार हजार रूपये द्यावे लागतील अशी डिमांड केली.

यासाठी त्याने अगदी साहेबांचे नाव देखील सांगितले. हा क्षण छुप्या कॅमेर्‍यात कैद होऊन त्या मालकाने याची माहिती आपल्या समव्यावसायिकांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार काही दिवसांपूर्वीचा असला तरी आता याला नव्याने फोडणी मिळालेली आहे.

या प्रकारावर राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर या स्टींग ऑपरेशनमुळे चवताळलेल्या त्या त्रयस्थाने आता संबंधीत बार मालकावर बाहेरच्या पथकाच्या माध्यमातून छापा टाकण्याची मोर्चेबांधणी केल्याचे वृत्त आहे. बार आणि हॉटेलमालकांच्या वर्तुळात याबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह