जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२३ । जळगाव जिल्ह्यात आणखी दोन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. इब्राहीम उर्फ टिपू उर्फ टिप्या साततार मण्यार (रा. वराडसीम ता. भुसावळ) आणि आकाश संतोष भोई (रा. साने गुरुजी वसाहत चोपडा) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या दोघांची नावे असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश आज शुक्रवार दुपारी काढले.
इब्राहीम उर्फ टिपू याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला ३ गुन्हे, एमआयडीसी पोलीस स्टेशनला २ तर फैजपुर आणि शनीपेठ पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला त्याच्याविरुद्ध दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. तरीदेखील त्याची गुन्हेगारीची प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही, त्यामुळे त्याची कारवाई करत पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
या सोबतच चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश संतोष भोई याच्याविरुध्ददेखील सात गुन्हे दाखल आहेत. तसेच अदखलपात्र गुन्हे, प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्धही वरील प्रमाणेच कृत्य केल्याने चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता. त्या प्रकरणीही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबध्दतेचे आदेश दिले. त्यानुसार चोपडा पोलिसांनी ताब्यात घेवून नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली. या कारवाईकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या सह त्यांचे सहकारी आणि संबंधित पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले.