जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२३ । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) महाराष्ट्रातील खासदारांची बैठक आयोजित केली होती. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीच आमच्याशी असलेली युती तोडली, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला. मात्र, युती तोडण्याचा फोन उद्धव ठाकरे यांना कुणी केला होता? याची माहिती मोदींनी घ्यावी. सर्व माहिती रेकॉर्डवर आहे, असा पलटवार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. आता त्यावर तत्कालीन भाजपचे नेते आणि आताचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोलखोल केली आहे.
काय म्हणाले नाथाभाऊ?
युती आम्ही तोडली नाही तर उद्धव ठाकरे यांनीच तोडली, असं मोदी म्हणाले. मोदींनी खासदारांना जे सांगितलं ते अर्धसत्य आहे. मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झाल्यामुळे भाजपचं सरकार येईल असा आम्हाला विश्वास होता. भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला होता. त्यामुळे अनेकांना तिकीट देणं कठिण होतं. म्हणून आमच्यात चर्चा सुरू झाली. त्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.
निवडणुकीच्या दोन अडीच महिन्याआधीच युती तोडण्याचा आमचा निर्णय झाला होता. त्यानंतर भाजपने युती तोडली. आम्ही पक्षात चर्चा करूनच निर्णय घेतला. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि मीही होतो. युती तोडायचं हे कुणी आणि कसं सांगावं? यावर आमच्यात चर्चा झाली. मला तातडीने मुंबईला बोलावलं गेलं. फडणवीस त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते. फडणवीस यांनीच युती तोडण्याची घोषणा करायला हवी होती. पण ती जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना फोन करून युती तोडत असल्याचं सांगितलं, असं खडसे म्हणाले.
यावेळी खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना हल्ला केला. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष फोडला तेव्हा एकनाथ शिंदे अधिक बीजेपी असे बहुमत झाले होते. तिसऱ्या पक्षाला सोबत घेण्याची गरज नव्हती. पण सर्व्हे आले. आता लोकसभेच्या निवडणूका येऊ घातल्या आहेत. त्या निवडणूका जिंकायचा असेल तर शिवसेना आव्हान देऊ शकते म्हणून शिवसेनेला (ठाकरे ) टार्गेट केलं जातंय.