जळगाव लाईव्ह न्यूज | ७ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांच्या विरोधात दंड थोपटले आहे. त्यांनी याआधीच राज्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पहिली सभा छगन भुजबळांच्या मतदार संघात घेतली मात्र त्यानंतर पवारांनी राजकीय दौरे स्थगित केले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याचे रणशिंग फुंकले आहे. शरद पवार हे १७ ऑगस्टपासून पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे.
अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फुट शरद पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे अजित पवारांसह बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार राज्याचा दौरा करणार आहेत. अजित पवारांसोबत गेलेल्या सर्वांची हकालपट्टी करतानाच, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. याविरोधात जनतेच्या न्यायालयातही जाण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे. त्यामुळे या सर्वांचा बंदोबस्त करण्याचा विडा पवारांनी उचलला असून, या दिग्गजांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभांचा धडाका लावणार आहेत.
शरद पवार हे १७ ऑगस्टपासून सभांचा धडाका लावणार आहेत. पवार हे बीडपासून सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते विभागवार एकेक जिल्ह्यात सभा घेतील. बीडनंतर शरद पवार हे जळगाव जिल्ह्याचा दौरा करणार आहे. प्राप्त माहितीनुसार शरद पवार ४ सप्टेंबरला जळगावला येणार असून जिल्ह्यात त्यांची विराट सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एका सभेनंतर दहा दिवसांचा ब्रेक घेतील. त्यानंतर पुढची सभा घेतील, अशी माहिती मिळाली आहे.