जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२३ । मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधींना (Rahul Gandhi) मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (SC) मोठा निर्णय देत राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
23 मार्च रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना मोदी आडनाव बदनामी प्रकरणात दोषी ठरवले. यासोबतच त्यांना दोन वर्षांची शिक्षाही ठोठावण्यात आली होती. यानंतर राहुल यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करून कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
मात्र गुजरात हायकोर्टाकडूनही दिलासा न मिळाल्याने राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मोदी आडनाव प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्याबाबच्या याचिकेवर आज शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा देत शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळाली आहे.
संसदेच्या अधिवेशनात सहभागी होता येईल
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आता राहुल गांधी यांची खासदारकीही बहाल करण्यात आली आहे. अशा स्थितीत ते संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही सहभागी होऊ शकतील, असे मानले जात आहे. मात्र, न्यायालयात अपील प्रलंबित असेपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.