जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२३ । गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घेतला आहे. यातच बुलढाणा जिल्ह्यामधील काही ठिकाणी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळी झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांसह हजारो गुरढोरं वाहून गेले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. याच दरम्यान, ठाकरे गटाने बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. इतकंच नव्हे तर पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यास ठाकरे गटाकडून ११०० रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
पावसामुळे झालेल्या बिकट परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याकडे एकदाही ढुंकून पाहिले नाही, असा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांची साधी विचारपूस देखील केलं नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.
पुरामुळे संसार उध्वस्त झाल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून अनेक नागरिक उपाशी पोटी दिवस काढत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना प्रशासनाकडून कुठलीही मदत केली जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
बुधवारी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठले. अचानक पदाधिकारी पोलीस ठाण्यात आल्यानंतर काही काळ पोलिसही गोंधळून गेले होते. हे पदाधिकारी कोणत्या कामासाठी आले असावे, असा प्रश्न पोलिसांना पडला. मात्र त्यांनी चक्क पालकमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दिल्याने व त्यांना शोधून आणण्याची अजब मागणी केल्याने पोलिसही थक्क झाले.