जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२३ । रायगड जिल्ह्यामधील इर्शालवाडी गावावर दरड कोसळल्याने संपूर्ण गाव जमीनदोस्त झालं असून या घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान, दुर्घटनास्थळी उपस्थित असलेल्या मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी धक्कादायक माहिती सांगितली आहे.’२ दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत.’, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
रायगड जिल्ह्यातल्या खालापूरजवळच्या इर्शालवाडी गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शालवाडी गावावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा अधिक जण मलब्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे गाव खालापूरच्या इर्शालगडावरील चौकापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे.
दरम्यान, घटनास्थळी गिरीश महाजांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘बचावकार्य सुरु असून मुसळधार पाऊस असल्यामुळे अडचणी येत असून मी रात्री तीन वाजल्यापासून वरती आहे. माती घरांवर कोसळ्याने ती दबली आहेत. इथे येण्याचा मार्गही कठीण आहे. पाऊस जोरात असल्याने काम करणं शक्यच नाही.आतापर्यंत सहा मृतदेह मिळाले आहेत. मातीचा ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढणं फार कठीण काम आहे. या गावाची लोकसंख्या 250 आहे. त्यातील 70 ते 80 लोकांची माहिती मिळाली आहे.’
‘या दुर्घटनेमध्ये बचावलेल्यांचा आकडा किती असेल हे सांगणे कठीण आहे. नातेवाईकांकडे चौकशी सुरु आहे. ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढणंसुद्धा कठीण आहे. दोन ते तीन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत. कारण मातीचा ढिगारा घरांवर येऊन पडला आहे. पाऊसही थांबत नाहीये. इथे हेलिकॉप्टर येणे देखील शक्य नाही.’ अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे.