जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२३ । दिवाळीत वेचलेला कापूस अद्यापवतो शेतकऱ्यांच्या घरात पडून होता. कारण योग्य भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवलेला होता. आपल्या कापसाला भाव मिळेल या भाबळ्या आशेने शेतकरी डोळे लावून बसला होता. मात्र अशातच आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे.
कापसाच्या दरात वाढ झाल्याचं कळताच अनेक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत कापसाचे दर प्रतिक्विंटल वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील वर्षी पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल अकरा हजार ते बारा हजार रुपये दर होता. त्यामुळे यावर्षी देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात इतर पीक न घेता कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र यंदा कापसाला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळे मध्यमवर्गीय शेतकरी यांनी गरजेपुरता कापूस विक्रीस काढला होता. तसेच बरेच शेतकऱ्यांनी अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्याने कापूस घरातच ठेवला आहे.
आज ना उद्या कापसाला भाव मिळेल या आशेवर शेतकरी होते. होळीचा सण गेला तरीही कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले होते. मात्र आता कापसाचे काहीसे भाव वाढले आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या कापसाला प्रतिक्विंटल जवळपास 8300 ते 8500 रुपयापर्यंतचा (हा दर अंदाजित आहेत) दर मिळत आहे. येत्या काही दिवसांत कापसाचे दर प्रतिक्विंटल वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विदर्भातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल 8 हजार 600 पर्यंत भाव मिळत आहे. मराठवाड्यात कापसाला प्रतिक्विंटल 8 हजार 100 ते 8 हजार 200 रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत