महागाईचा आणखी एक झटका : महाराष्ट्रात पुन्हा वीज दरवाढ होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२२ । वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार आहे. ही वाढ किमान 60 पैसे प्रति युनिट इतकी मोठी असण्याची शक्यता असून यामुळे ग्राहकांचे मासिक वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला पुन्हा कात्री लागणार आहे.
सध्या हे शुल्क 1.30 रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.वीज खरेदीपोटी महावितरणला जवळपास 40 हजार कोटी रुपयांची वसुली गरजेची आहे. त्यामुळे वीज दरवाढ केली जाणार आहे. राज्यात महानिर्मिती 7 औष्णिक वीज प्रकल्पांमधून 30 संचांद्वारे वीजनिर्मिती करत असते. सप्टेंबर अखेरपर्यंत कंपनीला 34 हजार 806 कोटींचा वीज खरेदी खर्च आला. त्यामुळे आता याचा खर्च आता सर्वसामान्यांकडून वसूल केला जाणार आहे.
उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढली असताना कोल इंडियाकडून फक्त 20 टक्के कोळसा पुरवण्यात आला होता. त्यामुळे महानिर्मितीला बाहेरून कोळसा खरेदी करावा लागला. त्यासाठी 20 हजार कोटींचा खर्च आला. तसंच क्रॉस सबसिडीतील पैसादेखील कोरोना काळात मिळाले नाही. त्यामुळे आणखी 20 हजार कोटींचे नुकसान झाले आहे, त्यामुळे किमान 40 हजार कोटींच्या घरात नुकसान झाले आहे, अशी माहिती ज्येष्ठ वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितलं.
महावितरणकडून जुलैपासून 1.35 रुपये प्रति युनिट वाढ करण्यात आली असून इंधन दर आकारला जात आहे. ही मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. आता हा आकार 1.90 रुपये असू शकतो. इंधन समायोजन आकार वाढवला नाहीतर तर पुढील वर्षी वीज दरवाढ अटळ असल्याचे सांगितले जात आहे.