जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । केळी पट्ट्यात थंडीची चाहूल लागताच केळीवर करपा व चरकाचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. आधीच सीएमव्हीने त्रस्त झालेले केळी उत्पादक या करपा व चरकाने धास्तावले आहेत.
केळी उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. आधीच सीएमव्हीमुळे केळी उपटून फेकून द्यावी लागली आहेत. रावेर, यावलसह तापी काठच्या भागात थंडीची चाहूल लागताच केळीवर करपा पडला आहे. केळी पानाच्या कडा करपू लागल्या आहेत. तर पानांवर तांबूस पिवळसर पट्ट्या दिसून येत आहेत. यामुळे केळी खोड व पोग्यापर्यंत अन्न व पाणी पोहोचत नाही. पर्यायाने हे केळी खोड उपटून फेकल्याशिवाय पर्याय राहत नाही.
तसेच आजूबाजूला पण या रोगाचा प्रसार होतो. यावर उत्पादकांना फवारणीसाठी मोठा खर्च करावा आहे. करपाच्या औषधासाठी २०१६ पूर्वी अनुदान दिले जायचे. मधल्या काळात ते बंद करण्यात आले. अनुदान पुन्हा सुरु करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आधीच केळी बागांना लागवडीपासून मोठा खर्च केला असतो. त्यातच या रोगामुळे केलेला खर्च वाया जातो व उत्पादनात मोठी घट होते. पर्यायाने लागवडीसाठी केलेला खर्चही निघू शकत नाही. यापुढे थंडीचा जोर वाढेल व केळी बागावर करपा व चरकाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे उपाययोजना होणे आवश्यक आहे. केळी उत्पादकांना फवारणी औषध मोफत द्यावे, याबाबत कृषी विभाग व शासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.