जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२२ । डीजे वाहनातून साहित्य लांबवणार्या तिघांच्या पारोळा पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. तामसवाडी गावातील दिलीप देविदास चौधरी यांच्या डीजे आयशर (एम.एच.41 सी.7819) मधून चोरट्यांनी साहित्य लांबवल्यानंतर ही करण्यात आली.
चोरट्यांनी 50 हजारांचे चार व्हीसीपी लाईट, 20 हजारांची पायलट पेटी, आठ हजारांचे कॉर्डलेस माईक व दहा हजार रुपये किंमतीचे मिक्सर मिळून 88 हजारांचे साहित्य लांबवले होते. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल होता.
पारोळ्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी नाईक प्रदीप पाटील यांच्याकडे तपास दिल्यानंतर त्यांनी नमूद आरोपीकडे एक इसम पाठवित चोरीचे साहित्य विकत घेण्याची तयारी दर्शवली व रविवार, 23 रोजी संध्याकाळी सात वाजता मुद्देमाल देण्याची वेळ ठरली. विकत घेणारा व साध्या कपड्यात सहा पोलिस तामसवाडी गावात सापळा रचून पाठवण्यात आले. संशयीत रोहित शिवाजी पाटील (22, तामसवाडी) यास मुद्देमालासह अटक करण्यात आली तर अन्य साथीदार गणेश रघुनाथ पवार (20) व रोहित श्याम नाना पाटील (19, रा.तामसवाडी) असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तसेच या तिघांनी तामसवाडी येथील शाळेतून जून महिन्यात टिव्ही चोरल्याची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नाईक प्रदीप पाटील, हेमचंद्र साबे, राहुल पाटील, आशिष गायकवाड यांनी ही कारवाई केली.