जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । सध्या लग्न करून फसवणूकीचे प्रकरण वाढले असून पाचोऱ्या तालुक्यात पहिले तीन पती असताना चौथ्याशी घरोबा करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पाचोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकणी सहाजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नवरीसह चारजणांना अटक करण्यात आली आहे.
सागर उत्तम दांडगे (२८, रा. भवानीनगर वरखेडी नाका, पाचोरा) यांनी पोलिसांत याबाबत फिर्याद दाखल केली होती. अखेर पाचोरा पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. दांडगे याचा विवाह दि. ११ जानेवारी २०१२ रोजी सपना ऊर्फ नम्रता संजय पवार (२२, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) हिच्याशी काकणबर्डी, ता. पाचोरा येथे झाला. यासाठी सखुबाई भिकन शिंदे (४५, रा. मोंढाळा रोड, पाचोरा) हिच्यासह दलाल समाधान वसंत दहातोंडे (रा. देऊळगाव), विजय रामभाऊ मुळे (रा.) भिऊगाव ता देऊळगावराजा), आशाबाई ऊर्फ सखुबाई भिकन शिंदे (रा. पाचोरा) व अन्य दोन महिला या मध्यस्थी होत्या. यावेळी दांडगे याच्या वडिलांनी १ लाख ६० हजार रुपये रोख दागिने घेण्यासाठी दलालामार्फत दिले होते. मात्र नवऱ्या मुलीला कोणत्याही प्रकारचे दागिने न घेता ते पैसे वरील चारही जणांनी वाटून घेतले.
लग्नानंतर सपना ही पाचोरा येथे सात दिवस राहिली. दलाल समाधान दहातोंडे याच्यासोबत माहेरी जाते म्हणून निघून गेली. ती परत न आल्याने दांडगे याने तिला परत येण्याविषयी सांगितले. नंतर तिने त्याला देऊळगावमही येथे बोलावून घेतले आणि महिनाभर तिथे थांबण्यास सांगितले. दांडगे यास तेथे मारहाण करण्यात आली. स्वतःचा जीव वाचवत दांडगे याने पाचोरा गाठले आणि पोलिसांनी माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी नवरीसह दलालांना अटक केली. सपना हिचा यापूर्वीच तीन जणांशी असा विवाह झालेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.