जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । भुसावळ शहरात अनधिकृतरीत्या घरगुती गॅसचे वाहनांमध्ये रिफिलिंग केले जात असल्याची माहिती मिळताच भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे यांनी छापेमारी करुन गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश केला. यावेळी दहा गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, वजनकाटा, गॅस भरण्यासाठी लागणारी मोटार असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी संशयित आरोपी शाहरुख खाटीक विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील स्टेट बँकेच्या पाठीमागे घरगुती वापराचे सिलिंडर हे अनधिकृतरित्या रिक्षा तसेच वाहनांमध्ये रिफिल केले जात असल्याची माहिती तहसीलदार निता लबडे यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर त्यांनी पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांना सोबत घेत सोमवारी दुपारी दिड वाजता तपासणी केली.
यावेळी एका रिक्षेत अनधिकृतरित्या गॅस रिफिलिंग होत असताना वाहन चालकाने धूम ठोकली. यावेळी पथकाने एचपी कंपनीचे नऊ भरलेले तसेच एक अर्धे भरलेले सिलिंडर, वजनकाटा, इलेक्ट्रीक मोटार व गॅस रिफिलिंगसाठी लागणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी रात्री उशिरा नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून शाहरूख खाटीक विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.