⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगावात गुरे चोरणारी धुळ्याची गॅंग जेरबंद

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । जळगाव जिल्ह्यातून गुरे चोरणाऱ्या टोळीचा एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. धुक्याच्या तिघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली असून पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात गुरे चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी गुन्हे उघडकीला आणण्याचे सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करून सूचना केल्या होत्या. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, पोहेकॉ अश्रफ शेख निजामुद्दीन, सुधाकर अंभोरे, चालक पोहेकॉ विजय चौधरी यांचा समावेश होता.

अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी शाकीर शहा उर्फ पप्पू बंब इब्राहीम शहा (वय-३१) रा. आजाद नगर, भोईवाडा धुळे हा असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने संशयित आरोपीला धुळ्यातून अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार सद्दाम उर्फ बोबड्या रशीद शेख (वय-२०) रा. बाबानगर धुळे, नईम शहा सलीम शहा (वय-२५) रा.भोईवाडा, वडजी रोड, धुळे आणि सलमान ऊर्फ मन्या अन्सारी रा. काबीरगंज धुळे असे नावे सांगितले. त्यापैकी शाकीर शहा, सद्दाम शेख आणि नईम शहा या तीन जणांना स्थानिक गुन्हे पथकाने अटक केली आहे.

गुन्ह्यातील संशयीत सलमान ऊर्फ मन्या अन्सारी हा फरार आहे. त्याचाही शोध सुरू आहे. अटक केलेल्या तिघांना अमळनेर पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तिघांकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.