⁠ 
सोमवार, मे 6, 2024

मृतदेहाचे ३६ तुकडे करायला आफताबला लागले १० तास, ..अशा पद्धतीने घेतले प्रशिक्षण

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । देशभरात सध्या श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येची चर्चा असून आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या श्रद्धाची अतिशय क्रूरपणे हत्त्या करणाऱ्या आफताबकडून समोर आलेली माहिती अंगावर काटे आणणारी आहे. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३६ तुकडे केले हे सर्वश्रुत असले तरी त्याला त्यासाठी १० तास लागले होते. इतकंच नव्हे तर ते तुकडे पाण्याने धुवून त्याने फ्रिजमध्ये ठेवले आणि दुर्गंधी येऊ नये म्हणून सुगंधित अगरबत्ती देखील तो जाळत होता. आफताबने या क्रूर कृत्याचे प्रशिक्षण आणि सर्व साधनांची जुळवाजुळव करण्यासाठी क्राईम वेबसिरीज आणि इंटरनेटचा उपयोग केल्याचे तपासात समोर आले आहे. (Shraddha Walkar Murder Case)

श्रद्धा वालकर हत्याकांडाचे पडसाद देशभरात उमटू लागले असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांकडून आफताबला फाशीची शिक्षा देण्यासाठी निवेदन दिले जात आहे. पोलिसांनी आफताबला न्यायालयात हजर केले असता त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याची नार्को टेस्ट करण्याची देखील परवानगी पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी आफताबची कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. पोलिसांनी संपूर्ण जंगल परिसर पिंजून काढत त्याची चौकशी केली आहे.

आफताबने दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाने गेल्या काही महिन्यापासून आफताबच्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. तसेच तो इतरांशी फोनवर बोललेले तिला आवडत नव्हते आणि त्याच मुद्द्यावरून दोघांमध्ये खटके उडत होते. श्रद्धाला आफताबवर संशय होता. दि.१८ मे रोजी दोघांमध्ये वाद झाल्यावर आफताबने तिची गळा दाबून हत्त्या केली. दरम्यान, हत्त्येच्या दीड महिना अगोदर देखील त्याच्या मनात श्रद्धाचा खून करण्याचा विचार आला होता मात्र तेव्हा श्रद्धा भावनिक झाली आणि रडू लागल्याने आफताबने तिला सोडून दिले होते.

दि.१८ मी रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब घाबरला होता. संपूर्ण शरीर पुरले तर आपण पकडले जाऊ अशी भीती त्याच्या मनात होती. त्यामुळे त्याने तिच्या शरीराची इतर पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे ठरविले. श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने तिचा चेहरा जाळून टाकला. मृतहेदाची ओळख पटू नये म्हणून त्याने हे केले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याची माहिती मिळवण्यासाठी त्याने इंटरनेटवर बरीच माहिती सर्च केली. काही क्राईम वेबसीरीज पहिल्या असल्याने त्यातून त्याला बरेच गुन्हेगारी ज्ञान मिळाले होते. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी कोणता चॉपर लागेल आणि कुठे मिळेल हे त्याने नेटवर सर्च केले.

आफताबला श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी तब्बल १० तास लागले होते. त्यामुळे तो थकून गेला होता. त्यामुळे त्याने नंतर आराम केला. त्यानंतर बियर प्यायला. सिगारेट ओढली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे त्याने अनेक तास पाण्याने धुतले. त्यानंतर ऑनलाइन जेवण मागवलं आणि नेटफ्लिक्सवर सिनेमाही पाहिला. त्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे ३६ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यासाठी त्याने मोठा फ्रिज खरेदी केला होता. रोज रात्री २ वाजता उठून तो महरौली येथील जंगलात जायचा आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकायचा. तब्बल २० दिवस हे असंच सुरू होते.

आणखी धक्कादायक माहिती म्हणजे, श्रद्धाची हत्त्या केल्यानंतर देखील आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. तसेच ऑनलाइन अँपद्वारे जेवणाची ऑर्डर देत होता. मे महिन्यात त्याने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतरही तो ९ जूनपर्यंत तिचे सोशल मीडिया अकाऊंट चालवत होता. तसेच तिच्या मित्रांशी गप्पा मारत होता. याच काळात तो इतर मुलींच्याही संपर्कात होता. त्यांना तो आपल्या घरी आणायचा, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. श्रद्धा वालकर ही महाराष्ट्रातील पालघरची राहणारी होती. ती आफताबच्या संपर्कात आली होती. दोघे एका कॉल सेंटरमध्ये भेटले होते. घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने दोघांनी दिल्ली गाठली होती. येथील महरौलीतील एका फ्लॅटमध्ये दोघेही लिव इन रिलेशनशीपमध्ये राहत होते.