⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

दंगलीतील जखमी तरुणाचा मृत्यू, सहा जणांची चौकशी

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात ३० डिसेंबर रोजी रात्री दोन गटात दगडफेक होऊन दंगल झाली होती. या दंगलीत जखमी झालेल्या शकील अली उस्मान अली (वय ३०) या तरूणाचा गुरूवारी दुपारी २ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी कुमार चिंथा यांनी शहर पोलीस ठाणे, घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

शिवाजीनगर हुडको परिसरात ३० डिसेंबर रोजी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरुन  दगडफेक होऊन दंगल झाली होती. घराबाहेर सुरू असलेल्या दंगलीत आपल्या भाच्याचा सहभाग तर नाही ना? अशा काळजीपोठी त्याला पाहण्यासाठी शकील अली उस्मान अली हा तरूण  घराबाहेर आला असता त्याच्या डोक्याला दगड लागला त्यात तो खाली पडल्यामुळे डोक्याच्या मागच्या बाजुसही जबर दुखापत झाली. दोन दिवस खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर शकील घरी गेला होता. त्यानंतर बुधवारी ५ जानेवारी रोजी पुन्हा तब्येत खालावल्याने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना गुरुवारी ६ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता त्याचा मृत्यू झाला.

दंगलीप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी सकाळीच घटनास्थळी आणि शहर पोलीस ठाण्यात भेट देत पाहणी केली. तसेच दुपारी रुग्णालयात देखील भेट देऊन त्यांनी परिस्थितीची आढावा घेतला.

हे देखील वाचा :