जळगाव लाईव्ह न्युज| ७ ऑगस्ट २०२२ | राज्यात शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन होऊन सव्वा महिना होऊन गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सध्या कारभार बघत आहे. अद्यापही या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली.
या राज्यात अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही. शिंदे सरकार अस्तित्वात नाही. 37 दिवस झाले सरकारचा पोरखेडपणा सुरू आहे, अशी टीका खडसे यांनी केली. शिंदे सरकारचं अजून मंत्रिमंडळ नाही. दोघांचा कारभार सुरू आहे. एक मुख्यमंत्री आहे तर दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री आहे. त्यांच्याकडे एकही खाते नाही. साऱ्या फायलींचा मुख्यमंत्र्यांकडे ढिग लागतोय. शिंदे सरकारचे अडीच वर्षे बाकी आहेत. मला असं वाटत नाही की, सरकार अडीच वर्ष टिकेल. एक वर्षात निवडणुका (Elections) लागल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. निर्णय घ्यायला या राज्यात कोणी नाही. राज्यातील जनता हवालदिल आहे.
राज्यातील विकासकामे रखडली
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात अद्याप मंत्रिमंडळ तयार झालं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचाच कारभार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडं फायलींचा ढिग असतो. उपमुख्यमंत्री तर बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळं राज्यातील विकासकामे रखडली असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
राज्यात शिंदे सरकारकडं अडीच वर्षांचा वेळ बाकी आहे. परंतु, अजून इतर मंत्र्यांनी शपथ घेतली नाही. एक महिना ओलांडला, तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हे सरकार अडीच वर्षे चालेल, असं वाटत नसल्याचं खडसे म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या राज्यात निर्णय घेणार फक्त एकच व्यक्ती आहे. त्यामुळं एकूण किती दिवस हे सरकार टिकेल, काही सांगता येत नाही. या सरकारचा काही भरोसा नाही, असंही खडसे म्हणाले. एकंदरित कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असाच काहीसा संदेश एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.