⁠ 
शनिवार, मे 4, 2024

देवळाली शटलसह पॅसेंजर गाड्या सुरू होणार; ‘हा’ आहे रेल्वे मंत्रालयाचा आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । कोरोना कमी झाल्याने देशात सर्व सुरळीत होत आहे. परंतु सर्वसामान्यांची आधार असलेली पॅसेंजर (Passenger) अद्यापही रुळावर येऊ शकली नाहीय. मागील अडीच वर्षांपासून पॅसेंजर गाड्या बंद आहेत. यामुळे खेड्यापाड्यासह सर्वसामान्य, चाकरमान्यांचे अतोनात हाल होत आहे. दरम्यान, अशातच भारतीय रेल्वेने (Indian Railway) या आठवड्यापासून कोरोनाच्या काळात बंद असलेल्या पॅसेंजरसह मेल एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे भुसावळ (Bhusawal) येथून सुटणाऱ्या पॅसेंजर गाड्या देखील पूर्वपदावर येणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत. दरम्यान, या संदर्भात DRM यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाहीय.

कोरोना पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून सर्व रेल्वे गाड्या बंद करण्यात आले होते. मात्र त्यानतंर कोरोना कमी झाल्यानंतर अनेक रेल्वे गाड्या सुरु झाल्या आहेत. मात्र यात बंद आहे केवळ सर्वसामान्यांच्या पॅसेंजर रेल्वे. गेली अडीच वर्षांपासून नाशिक देवळाली शटल व मुंबई-भुसावळ पॅसेंजर या दोन गाड्या अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. नाशिक ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमाने पोटापाण्यासाठी दररोज प्रवास करतात. त्यांच्यासाठी नाशिक देवळाली – भुसावळ शटलसह अन्य पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची आवश्यकता आहे. पॅसेंजर गाड्यांमुळे केवळ चकारमन्यांचीच प्रश्न सुटणार नसून सर्वसामान्यांच्याही प्रवासाची सोय होणार आहे. चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावर चाकरमन्यांची संख्यादेखील अधिक आहे.

कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून पॅसेंजर गाड्या बंद असल्याचे सांगितले जाते. परंतु देशात लांब पल्ल्यांच्या गाड्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. त्यातून कोरोनाचा प्रसार होत नाही मग का केवळ पॅसेंजर गाड्यांमधूनच कोरोना कसा पसरेल? तसेच गेल्या काही दिवसापूर्वी सर्व गाड्यांचे जनरल तिकिट सेवा सुरु करण्यात आलेली आहे. याचे खर्‍या अर्थाने आत्मपरिक्षण करुन कोरोनापूर्व काळाप्रमाणे रेल्वेसेवा पूर्ववत झालीच पाहिजे,.

दरम्यान, रेल्वेने प्रशासनाने पुन्हा एकदा पॅसेंजर आणि बंद मेल एक्स्प्रेस गाड्या चालवण्याचा आदेश जारी केला आहे. बंद पडलेल्या सुमारे 500 प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय सुमारे 100 मेल एक्स्प्रेस गाड्याही रुळावर धावू लागतील. दरम्यान, या घोषणेमुळे भुसावळ येथून सुटणारी मुंबई पॅसेंजरसह नाशिक शटलसह विविध मार्गावरील पॅसेंजर गाड्या पुन्हा पूर्वपदावर येणार असून चाकरमान्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहेत.