जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । राज्यभरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी , नाल्यांना पूर आला आहे. नाशिक, पुणे, कोल्हापूर, पालघर, आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जुलैपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडीने दिली आहे.मुंबईमध्येही पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कायम राहील. मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे या भागात संपूर्ण काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच शक्य असल्यास अशा भागांमधून प्रवास करू नये, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान नाशिकमध्ये अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने प्रशासनाशीसंपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापूर्वी यापूर्वी जून महिन्यात जळगाव जिल्ह्याकडे मान्सूनने पाठ फिरविली होती. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला होता. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीलपासून जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत.












