जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । शहरातील घनकचरा प्रकल्पाच्या विषयावर सोमवारी मनपा महासभेत चर्चा करण्यात आली. सुमारे तासभर चर्चा झाल्यानंतर भाजपचा विषयाला असलेला आक्षेप आणि विरोध नोंदविल्यानंतर शिवसेनेकडून बहुमताच्या जोरावर विषयाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, विषयाला मंजुरीनंतर भाजपकडून नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी मतदानाची मागणी केली होती.

जळगाव शहर मनपाची महासभा दि.१४ रोजी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. मनपातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे सुधारीत मान्यतेनुसार स्थापत्य व बायोमायनिंगच्या कामासाठी वाढीव संविदा रकमेनुसार काम करून घेण्यास व वाढीव खर्च १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यास मान्यता मिळण्याचा प्रस्ताव गेल्या महासभेत तहकूब करण्यात आला होता. आज दि.१४ रोजी झालेल्या महासभेत घनकचरा प्रकल्पाचा विषय पुन्हा मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. विषयावर भाजप नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी आक्षेप घेतला. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी या विषयावर प्रशासनाची भूमिका आणि सविस्तर बाजू मांडली. भाजपकडून आक्षेप असून तो नोंदवून, विरोध देखील नोंदवावा आणि बहुमताने विषयाला मंजुरी द्यावी, अशी सूचना शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केली.
घनकचरा प्रकल्पाच्या विषयाला शिवसेनेकडून बहुमताने मंजुरी देण्यात आली. विषयाच्या मंजुरीनंतर भाजपकडून त्यावर मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. पुढील विषयांना मंजुरी देत नंतरचे सर्व विकासकामांचे विषय बहुमताने मंजूर करावे, असे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी सांगितले. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत शहरातील विकासकामांना निधी उपलब्ध करून दिल्याने आ.सुरेश भोळे यांचे नगरसेवक राजेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले.
हे देखील वाचा :
- डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; गोदावरी फाउंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये वाढदिवस जल्लोषात
- सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात चोरट्यांचा डल्ला; १.३५ लाखांचा ऐवज लंपास
- भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांसाठी मेगाभरती; ग्रॅज्युएट्स तरुणांना नोकरीची संधी..
- प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस ‘या’ स्थानकावरून सुटणार?
- जळगावात ९ ऑगस्टला ‘न्याय विश्वास फाउंडेशन’तर्फे मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर











