जळगाव लाईव्ह न्यूज । विशेष प्रतिनिधी । शहर मनपात ६ महिन्यांपूर्वी मोठा बॉम्बगोळा टाकत भाजपचे ३० नगरसेवक शिवसेनेत गेले होते. शिवसेनेकडून मिळालेल्या आश्वासनांची पुर्तता होत नसल्याने वाढत असलेला दुरावा टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहचला असून काही बंडखोर पुन्हा स्वगृही परतण्याच्या वाटेवर आहेत. भाजपच्या एका मोठ्या नेत्यासोबत या बंडखोरांच्या बैठका झाल्या असून दुसऱ्या भाजप नेत्याकडून यास दुजोरा मिळाला आहे. भाजपचे काही बंडखोर पुन्हा स्वगृही परतल्यास मनपातील चित्र बदलण्याची शक्यता आहे.
जळगाव मनपात काही महिन्यांपूर्वी भाजपच्या किल्ल्याला सुरुंग लावत शिवसेनेने २७ नगरसेवक फोडत आपला झेंडा मनपावर फडकावला होता. भाजप बंडखोरांच्या बळावर शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर तर भाजप बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौर झाले होते. शेवटच्या क्षणापर्यंत संकटमोचक माजी मंत्री आ.गिरीश महाजन, आ.सुरेश भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह इतर दिग्गजांनी नगरसेवकांना आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
बंडखोर बाहेर पडल्यानंतर दोन्ही पक्षाकडून टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आली होती. भाजपातून बाहेर पडलेल्या नगरसेवकांनी मोठी रक्कम घेतल्याची देखील चर्चा होत होती. दोन दिवसांपूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनाप्रसंगी ‘गांधी लढे ते गोरो से, हम लढेंगे चोरो से’ अशा घोषणा देत निशाणा साधला होता. नागरिकांकडून वेळोवेळी नगरसेवकांच्या नावाने ओरड होत आहे.
शिवसेनेतून पुन्हा स्वगृही जाण्यासाठी सध्या तीन चर्चा सुरु आहे. त्यात पहिली चर्चा अशी कि, भाजपातून बाहेर पडत असलेल्या नगरसेवकांना शिवसेनेकडून काही आश्वासने देण्यात आली होती. सुरुवातीला सर्व सुरळीत असताना आता मात्र त्या शब्दाचा सेनेला विसर पडत चालल्याचे बोलले जात आहे. भाजपातून बाहेर पडलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी न्यायालयीन खर्च सेनेकडून करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र आता तो खर्च बंडखोरांना करावा लागणार असल्याची चर्चा आहे. याचिकेच्या सुनावणीसाठी देखील नगरसेवकांना वारंवार नाशिकला जावे लागत आहे.
दुसरी चर्चा अशी कि, जळगाव शहरातील विविध विकासकामांसाठी सध्या मोठ्याप्रमाणात निधी मिळत असून त्याची टेंडर प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. टेंडर देताना बंडखोर नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसून त्यांना कुठेच कामे मिळत नसल्याचा ठपका ठेवला जात आहे. किमान आपल्या प्रभागातील कामे आपल्याच माणसांना मिळावी या मागणीला सेनेच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खो दिल्याचे बोलले जात आहे. तसेच एका बड्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या प्रभागात अडीच कोटींच्या निधीतून कामे टाकले असल्याने त्यामुळे देखील काही नगरसेवक नाराज झाले होते.
तिसऱ्या चर्चेतील महत्वाचा मुद्दा म्हणजे, सेनेच्या एका दिग्गजाकडून दिलेला आर्थिक शब्द पाळला जात नसून काही बंडखोरांना अद्यापही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. मी स्वतः राजीनामा देऊन देईल पण तो विषय काढू नका अशी भूमिका सेनेच्या त्या प्रमुखाने घेतल्याची चर्चा आहे.
जळगाव शहरात काही दिवसांपूर्वी आलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोर भाजप नगरसेवकांच्या बाबतीत बोलताना सांगितले होते कि, त्यांना काही आमिष देण्यात आले असावे त्यामुळे ते तिकडे गेले आहे. आपण केलेली चूक त्यांना लक्षात आल्यावर ते पुन्हा स्वगृही परततील. सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. जळगाव शहरात गेल्या आठ दिवसापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत असून काही बंडखोरांची भाजपच्या एका मोठ्या नेत्यासोबत दोन बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या एका नेत्याने या वृत्ताला दुजोरा दिला असून योग्य वेळी नेते माहिती देतील असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला आहे.