जळगाव जिल्हाशैक्षणिक

चौथी-सातवीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क आता जिल्हा परिषद भरणार

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क तसेच शाळांचे संलग्नता शुल्क आता जिल्हा परिषदेमार्फत भरले जाणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

५ टक्के निधीतून केली जाणार तरतूद

राज्य शासनाने या निर्णयाला मान्यता दिली असून, जिल्हा परिषदांच्या स्वउत्पन्न अंदाजपत्रकात शाळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी राखून ठेवलेल्या ५ टक्के निधीतून यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निधीतून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आणि संबंधित शाळांचे संलग्नता शुल्क भरता येणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. अनेक पालकांना आर्थिक अडचणींमुळे शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरणे शक्य होत नाही. त्यामुळे गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी गमवावी लागू शकते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने विद्यार्थ्यांच्या शुल्काचा भार जिल्हा परिषदांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा बंधनकारक

ऑक्टोबर २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्क आणि शाळांचे संलग्नता शुल्क जिल्हा परिषदांच्या स्वनिधीतून भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता त्याला मान्यता मिळाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होण्यासाठी मदत मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button