सोने - चांदीचा भाव

ग्राहकांसाठी गुडन्यूज ! धनत्रयोदशीला जळगावच्या सुवर्णबाजारात सोने ३,८७० तर चांदी ६ हजारांनी स्वस्त

जळगाव लाईव्ह न्यूज | दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पवित्र मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या पार्श्वभूमीवर जळगावच्या सुवर्ण बाजारातून ग्राहकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मोठी उसळी घेतल्यानंतर आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. Gold Silver Rate Today

बाजारपेठ उघडताच आज सकाळी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे तब्बल ३,८७० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे ६,००० रुपयांची घसरण झाली आहे. या अचानक आलेल्या घसरणीमुळे धनत्रयोदशीला खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी सराफ बाजारात मोठी खरेदी होते. मात्र, धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना महागाईचा फटका बसला होता. अशातच आज सकाळी दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.

जळगावात आज सोन्याचे दर किती?

जळगाव सराफ बाजारात आज सकाळच्या दरानुसार २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख २९ हजार ४३० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४१ हजार ३०० रुपये इतका आहे. गुरुवारी सायंकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४५ हजार १७० रुपये होता. त्यात आज ३ हजार ८७० रुपयांची घसरण झाली आहे.

चांदीही ६ हजारांनी स्वस्त

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. जळगाव सराफ बाजारात आज चांदीचा भाव प्रति किलो १ लाख ८६ हजार रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी चांदीचा दर १ लाख ९२ हजार रुपये होता. त्यात आज एकाच दिवसात ६ हजार रुपयांची घट झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिका-इराणमधील तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीतील बदल आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर होत आहे. काही काळ मोठी घसरण झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली होती.

मात्र, आज धनत्रयोदशीच्या दिवशी दरात झालेल्या घसरणीमुळे खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आज जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button