
जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसात सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. दिवाळीच्या तोंडावर दर कमी झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, दिवाळीच्या आदल्या दिवशीच सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति तोळा ३ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो १० हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात दर वाढल्याने ग्राहकांच्या खरेदीच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होतील, अशी अपेक्षा ग्राहकांना होती. गेल्या काही दिवसांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने खरेदीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दिवाळीच्या आदल्या दिवशी अचानक दरवाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.
सोन्याचे दर किती झाले?
आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ४१ हजार ५०० रुपये झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख २९ हजार ६१५ रुपये नोंदवण्यात आला आहे. एका दिवसात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
चांदीही १० हजारांनी महागली
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव १ लाख ९० हजार रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात एका दिवसात तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दागिने आणि वस्तू खरेदी करणाऱ्यांनाही फटका बसला आहे.
दिवाळीत खरेदीवर परिणाम होणार?
दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी होण्याची अपेक्षा होती. मात्र, दरवाढीमुळे अनेक ग्राहक खरेदीचा निर्णय पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीचे दर वाढल्याने सराफा बाजारातील खरेदी-विक्रीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




