
जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण आज शुक्रवारीही कायम राहिली आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात बाजार सकाळी सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅममागे १ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो तब्बल ६ हजार रुपयांची घसरण झाली. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घसरणीमुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण
जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीतील घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेतील महागाई, डॉलरची स्थिती, बाँड यील्डमधील बदल आणि भू-राजकीय तणाव यांसारख्या घटकांचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींकडे सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.
जळगावच्या सुवर्ण बाजारात मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. मध्यंतरी दरात काहीशी वाढ झाली होती. मात्र, दसऱ्यानंतर दरात घसरणीचे चित्र पाहायला मिळत आहे. या आठवड्यातही ही घसरण कायम राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
सोन्याचा भाव १ लाख ४१ हजार ३०० रुपयांवर
गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४२ हजार ८०० रुपये होता. शुक्रवारी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात १ हजार ५०० रुपयांची घट झाली. त्यामुळे सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम १ लाख ४१ हजार ३०० रुपयांवर आला आहे.
चांदीच्या दरात एका दिवसात ६ हजारांची घसरण
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी चांदीचा भाव प्रतिकिलो १ लाख ९६ हजार रुपये होता. शुक्रवारी त्यात तब्बल ६ हजार रुपयांची घट झाली असून, चांदीचा दर प्रतिकिलो १ लाख ९० हजार रुपयांवर आला आहे.
दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या काळात सोने-चांदी खरेदीला विशेष महत्त्व असते. अशा वेळी दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे.सोन्या-चांदीच्या दरातील घसरण पुढील काही दिवस कायम राहते की बाजारात पुन्हा तेजी येते, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.





