रेल्वे

जळगावकरांना दिलासा! उधना-अमरावती नवीन एक्स्प्रेस आजपासून धावणार; थांबे अन् वेळापत्रक पाहा..

जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळी आणि छठ सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना-अमरावती दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वे आज, २६ ऑक्टोबरपासून धावणार असून, जळगाव, भुसावळ, अमळनेर आणि धरणगावसह खान्देशातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

उधना-अमरावती विशेष रेल्वेचे वेळापत्रक

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९०१३ उधना-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वे दर सोमवारी उधना येथून सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही गाडी अमळनेर येथे दुपारी ३.२० वाजता, धरणगाव येथे ३.५० वाजता, जळगाव येथे सायंकाळी ४.४० वाजता, भुसावळ येथे ५.१५ वाजता आणि बोदवड येथे ५.५५ वाजता पोहोचेल. त्यानंतर ही गाडी त्याच दिवशी रात्री ९.२० वाजता अमरावती येथे पोहोचेल. ही विशेष रेल्वे २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दर सोमवारी धावणार आहे.

अमरावती-उधना परतीच्या गाडीचे वेळापत्रक

गाडी क्रमांक ०९०१४ अमरावती-उधना विशेष रेल्वे अमरावती येथून रात्री ११.३० वाजता सुटेल. ही गाडी बोदवड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे २.३३ वाजता, भुसावळ येथे ३.२० वाजता, जळगाव येथे पहाटे ४ वाजता, धरणगाव येथे ४.५० वाजता आणि अमळनेर येथे ५.०९ वाजता पोहोचेल. त्यानंतर ही गाडी सकाळी ९.३५ वाजता उधना येथे पोहोचेल. परतीची विशेष रेल्वेही २६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चालविण्यात येणार आहे.

या स्थानकांवर मिळणार थांबा

उधना-अमरावती विशेष रेल्वेला दोन्ही दिशांनी व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नर्डाना, अमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

या गाडीमुळे सूरत परिसरातून खान्देशात येणाऱ्या तसेच खान्देशातून विदर्भाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी रेल्वे उपलब्ध होणार आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात नियमित गाड्यांमधील गर्दी लक्षात घेता या विशेष रेल्वेचा प्रवाशांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

प्रवाशांसाठी विविध डब्यांची सुविधा

या विशेष रेल्वेमध्ये एसी चेअर कार, स्लीपर क्लास, जनरल सेकंड सीटिंग आणि जनरल सेकंड क्लासचे डबे उपलब्ध असतील. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार प्रवासाचे पर्याय निवडता येतील.

दरम्यान, धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष तथा पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे (डीआरयूसीसी) सदस्य महेंद्र कोठारी यांनी या रेल्वेसाठी रेल्वे प्रशासन आणि खासदार स्मिता वाघ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर ही विशेष रेल्वे सुरू होत असल्याने खान्देशातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button