गुन्हेजळगाव शहर

जळगावात चॉपर हल्ल्यात एकाचा मृत्यू, एक गंभीर!; संशयित काही तासांत जेरबंद

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील खेडी बुद्रुक येथील माऊली नगर परिसरात दुचाकीच्या लाईटवरून झालेल्या क्षुल्लक वादातून धारदार चॉपरने केलेल्या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला तर किशोर छगन पाटील हे गंभीर जखमी झाल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी साडेआठच्या सुमारास घडली. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच कारवाई करत संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.मयूर चैत्राराम जाधव असं अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली नगर परिसरात काही महिला बसलेल्या असताना संशयित मयूर जाधव हा दुचाकीवरून तेथे आला. त्याने दुचाकीचा लाईट सुरू-बंद केल्याने परिसरातील महिलांनी त्याला जाब विचारला. याच कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून संशयिताने धारदार चॉपरने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील आणि किशोर छगन पाटील यांना गंभीर दुखापत झाली. त्यापैकी किरण पाटील यांचा मृत्यू झाला, तर किशोर पाटील यांच्यावर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाला तपासासाठी नियुक्त केले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक माहिती गोळा केली. तसेच तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला.

या तपासानंतर मयूर चैत्राराम जाधव याला गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जखमी किशोर छगन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button