
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) सामील होऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सीआरपीएफने क्रीडा कोट्याअंतर्गत कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
या भरतीद्वारे एकूण ५२१ जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार rect.crpf.gov.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर २०२६ आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा?
या भरतीअंतर्गत हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदाच्या १८२ जागा, तर कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) या पदाच्या ३३९ जागा उपलब्ध आहेत. दोन्ही पदांसाठी क्रीडा कोट्यातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्याकरिता, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता १०वी उत्तीर्ण केलेली असावी, तर हेड कॉन्स्टेबल पदांसाठी, त्यांनी इयत्ता १२वी उत्तीर्ण केलेली असावी.
क्रीडा पात्रता आवश्यक
या भरतीसाठी क्रीडा क्षेत्रातील कामगिरीला महत्त्व देण्यात आले आहे. मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा किंवा चॅम्पियनशिपमध्ये राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करून तिसरे स्थान किंवा त्यापेक्षा चांगले स्थान मिळवलेले खेळाडू पात्र ठरू शकतात.
याशिवाय, आंतरविद्यापीठीय वैयक्तिक स्पर्धांमध्ये प्रथम किंवा द्वितीय स्थान मिळवलेले, सांघिक स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले किंवा कनिष्ठ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सुवर्ण अथवा रौप्यपदक जिंकलेले खेळाडूही पात्रतेनुसार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क
१ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे, अनुसूचित जाती-जमातींसाठी १० वर्षे आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी ८ वर्षांची वयोमर्यादा सवलत नमूद करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरातीतील वयोमर्यादेचे नियम तपासावेत.
सामान्य (GEN), OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. अनुसूचित जाती-जमाती, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.





