
जळगाव लाईव्ह न्यूज । जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीच्या माध्यमातून अद्ययावत संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे जातप्रमाणपत्र पडताळणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन व पेपरलेस करण्यात आली असून, अर्जदारांना अर्ज आणि त्यासोबतची कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे आदींच्या छायांकित प्रती किंवा हार्डकॉपी समिती कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता नाही. अर्जातील त्रुटींची पूर्तताही ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागणार आहे.
या नव्या प्रणालीमुळे अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्य:स्थिती व प्रगती ऑनलाइन पाहता येणार असून, अर्जाचा मागोवाही घेता येणार आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांबाबत समितीला काही शंका असल्यास आणि सुनावणी घेण्याची आवश्यकता भासल्यास अर्जदारांना समिती कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. अशा प्रकरणांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात येणार आहे.
जातप्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करणारे नागरिक, विद्यार्थी, शैक्षणिक प्रवेशासाठी अर्जदार, संबंधित प्राचार्य व लिपिक, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे तसेच सेवा व इतर प्रयोजनांसाठी जातप्रमाणपत्र पडताळणी करून घेणाऱ्या सर्व संबंधितांनी शासनाच्या निर्देशांनुसार ऑनलाइन व पेपरलेस प्रक्रियेचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष नयना बोंदार्डे, उपायुक्त राकेश महाजन आणि सदस्य सचिव एन.एस. रायते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.





