
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रेल्वेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर पश्चिम रेल्वेने अप्रेंटिससाठी भरती जाहीर केलीय. या भरती अंतर्गत तब्बल २ हजार ८ जागा भरल्या जाणार आहे. विशेष या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून दहावी आणि आयटीआय उत्तीर्णांना मोठी संधी आहे. लक्ष्यात असू द्या या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार असून पात्र उमेदवारांना ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
कोणत्या विभागात किती जागा?
उत्तर पश्चिम रेल्वेच्या आठ युनिट्समध्ये एकूण २,००८ प्रशिक्षण जागा आहेत. यामध्ये जयपूर विभागात सर्वाधिक ५८०, बिकानेर विभागात ५२४ आणि अजमेर विभागात ५०० जागा आहेत. याशिवाय जोधपूर विभागात १३४, बीटीसी कॅरेज अजमेरमध्ये १०१, बीटीसी लोको अजमेरमध्ये ६९, कॅरेज वर्कशॉप बिकानेरमध्ये ३३ आणि कॅरेज वर्कशॉप जोधपूरमध्ये ६७ जागा आहेत.
विविध ट्रेडचा समावेश
या भरतीमध्ये इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, सुतार, पेंटर, मेसन, पाईप फिटर, डिझेल मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, मेकॅनिक टूल मेंटेनन्स तसेच रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग यांसह विविध ट्रेडचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
अॅप्रेंटिस पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित ट्रेडमधील नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) असणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र NCVT किंवा SCVT कडून जारी केलेले असावे.
वयोमर्यादा काय?
या भरतीसाठी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान १५ वर्षे आणि २४ वर्षांपेक्षा कमी असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल. SC आणि ST उमेदवारांना ५ वर्षे, OBC उमेदवारांना ३ वर्षे, तर PwBD उमेदवारांना १० वर्षांची सवलत दिली जाणार आहे. माजी सैनिकांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
या भरतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांच्या निवडीसाठी स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. दहावी आणि संबंधित ट्रेडमधील ITI परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. दहावी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांची साधी सरासरी काढून मेरिट तयार केली जाईल. त्यानंतर विभाग, ट्रेड आणि प्रवर्गानुसार गुणवत्ता यादी तयार करून उपलब्ध जागांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. समान गुण असलेल्या उमेदवारांमध्ये जास्त वयाच्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी rrcjaipur.in या रेल्वे भरती कक्ष, जयपूरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. त्यानंतर लॉगिन करून वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून त्याची प्रत जतन करावी.





