गुन्हेरावेर

चिनावलच्या तरुण शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय; गावठी कट्ट्यातून स्वतःवर गोळी झाडली

जळगाव लाईव्ह न्यूज । सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनावल येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गावठी कट्ट्यातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपविल्याची घटना मंगळवारी (६ ऑक्टोबर) मध्यरात्री उघडकीस आली. निर्मल युवराज महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शेतीसोबत केळी व्यापाराचा व्यवसाय करत होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२.०५ वाजता निर्मल महाजन हा घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गेला. काही वेळाने गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने कुटुंबीयांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी निर्मल गंभीर अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. या कारवाईत पोलिसांना देशी बनावटीचा गावठी कट्टा, पाच रिकामे खोके तसेच दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

घटनास्थळी आढळलेल्या पाच रिकाम्या पुंगळ्यांमुळे पोलिसांसमोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच गावठी कट्टा निर्मल महाजन याच्यापर्यंत कसा पोहोचला, याचाही तपास केला जात आहे. त्यामुळे या घटनेचे नेमके कारण काय, याबाबत विविध शक्यता व्यक्त होत आहेत.

निर्मल महाजन हा आर्थिकदृष्ट्या सधन कुटुंबातील असून शेती आणि केळी व्यापारातून त्याचा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक, व्यावसायिक किंवा अन्य कोणत्या कारणातून ही घटना घडली, याचा तपास सावदा पोलीस करत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, तपासातील निष्कर्षानंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button