
जळगाव लाईव्ह न्यूज । अहमदाबादहून गावाकडे परतत असलेल्या दुसखेड्याच्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना परधाडे ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. संजय अनिल पाटील (वय ३६, रा. दुसखेडा, ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
संजय पाटील हे अहमदाबाद येथील एका खासगी कंपनीत वेल्डिंगचे काम करत होते. कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अहमदाबादहून गावाकडे निघाले होते. जळगाव येथे पहाटे पोहोचल्यानंतर त्यांनी पाचोरा जाण्यासाठी रेल्वेने पुढील प्रवास सुरू केला.
दरम्यान, परधाडे-पाचोरा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे पोल क्रमांक ३८१/२६ जवळ अचानक त्यांचा पाय घसरला. तोल गेल्याने ते धावत्या रेल्वेतून खाली पडले. या दुर्घटनेत गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल कमलेश पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ‘जय महाकाल’ रुग्णवाहिकेचे चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पंचनामा केला. त्यानंतर किशोर लोहार व मयूर सोनार यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक हरीश गवळी पुढील तपास करीत आहेत.संजय पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





