
जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा शहरातील बँकेत आलेल्या ग्राहकावर पाळत ठेवून संधी साधत ७७ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पाचोरा पोलिसांनी छडा लावला आहे. मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सांसी कडिया परिसरात पोलिसांनी विशेष कारवाई करत रितीक राजाराम सिसोदिया या संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदार दिनेश निलेश सोनवणे (वय ३०, रा. बनोटी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) हे पाचोरा येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे पैसे भरण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ते मोटारसायकलने काम करण्यासाठी स्वराज ऑटो गॅरेज, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, पाचोरा येथे गेले. त्यांनी रोकड असलेली बॅग गॅरेजमध्ये ठेवली असता, वाहनाचे काम करण्यात व्यस्त असताना अज्ञात चोरट्याने नजर चुकवून बॅगेसह ७७ हजार ५०० रुपये चोरून नेले.
या घटनेप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहेम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या.
तपासादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल हरीश परदेशी व त्यांच्या पथकाने घटनास्थळ तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित इसम फिर्यादीच्या बँकेपासून स्वराज ऑटो गॅरेजपर्यंत पाठलाग करताना दिसून आला. तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित इसम हा मध्यप्रदेशातील सांसी कडिया, जि. राजगड येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर १ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘ऑपरेशन MP’ सुरू करून पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांना मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले. पथकाने राजगड जिल्ह्यातील बोड़ा पोलीस ठाणे हद्दीतील सांसी कडिया गावात स्थानिक पोलिसांच्या मदतीने अचानक छापा टाकून आरोपी रतीसक सिसोदियाला ताब्यात घेतले.
आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेली संपूर्ण ७७ हजार ५०० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून आरोपीला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील अतिसंवेदनशील भागात जाऊन करण्यात आलेली ही कारवाई आणि चोरीस गेलेली संपूर्ण मुद्देमाल रक्कम हस्तगत करण्यात आलेली कारवाई पाचोरा पोलिसांची प्रभावी कामगिरी ठरली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल काशीनाथ शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहेम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात पोहेकॉ उमेश देविदास पाटील, पोहेकॉ राहुल काशीनाथ शिंपी, पो.कॉ. हरीश कर्नास परदेशी व पो.कॉ. श्रीराम अरुण शिंपी यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.





