जळगाव हादरले ! अवघ्या ८०० रुपयांच्या वादातून मामेभावाचा खून

सप्टेंबर 22, 2026 6:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अवघ्या 800 रुपयांच्या वादातून आत्तेभावाने त्याच्या मामेभावाचा खून केल्याची धक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात घडली. धर्मा जुगा पवार असे मृत व्यक्तीचे नाव असून, जुगा कांतिलाल पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे.या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

jugapawar

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धर्मा पवार याने दिवसभरात सुमारे ८०० रुपयांची रुद्राक्ष विक्री केली होती. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास धर्मा आणि जुगा हे दोघे स्टेशनजवळ दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी पैशांच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला.

वाद वाढत गेल्यानंतर आरोपी जुगा पवार याने धर्मा याच्यावर दगडाने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात धर्मा याचा मृत्यू झाला.हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान, शेताजवळ कुत्रे भुंकत असल्याचा आवाज पोलिसांना आला. त्या दिशेने शोध घेतला असता आरोपी जुगा पवार हा दारूच्या नशेत शेतात बसलेला पोलिसांना आढळून आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या बॅगेची तपासणी केली. त्यावेळी बॅगेत मृताच्या दातांसह दोन जिवंत कबुतरे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकारामुळे तपासाला वेगळे वळण मिळाले असून, आरोपीने मृताचे दात का काढले, याचा तपास पोलीस करत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी जुगा कांतिलाल पवार याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now