जळगावातील सुरत रेल्वे गेट २४ तास बंद राहणार; वाहनधारकांनी ‘हा’ पर्यायी मार्ग वापरा

सप्टेंबर 22, 2026 10:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील वाहतूकधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव रेल्वे स्थानकावर जळगाव-भुसावळ ५ व्या मार्गिकेसाठी यार्ड रीमॉडेलिंगचे तातडीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे जळगावमधील सुरत रेल्वे गेट (गेट क्र. १४८) २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून ते २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

railway gate

ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना मनस्ताप
रेल्वेच्या या महत्त्वाच्या कामामुळे या मार्गावरील काही मेमू आणि पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात गाड्या रद्द झाल्याने चाकरमानी, नागरिक व रोजच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. तसेच, काम सुरू असताना मार्गावरील रेल्वे वाहतूक नियंत्रित केली जाणार असल्याने काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या देखील मार्गात थांबवून (रेग्युलेट करून) चालवल्या जाणार आहेत.

वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

सुरत रेल्वे गेट बंद राहणार असल्याने जिल्हा दूध संघाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांसह खोटेनगर, निमखेडी शिवारी, गुजराल पेट्रोल पंप परिसर आणि शिवाजीनगरकडून या मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारकांवरही परिणाम होणार आहे.

त्यामुळे २३ आणि २४ सप्टेंबरदरम्यान संबंधित वाहनधारकांनी सुरत रेल्वे गेटचा वापर टाळून उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. पाचव्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी हे महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आले असून, कामाच्या कालावधीत रेल्वे वाहतूक तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने प्रवाशांनी आणि वाहनधारकांनी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now