पाचोऱ्यातील फूल विक्रेत्याला लावला तब्बल २३ लाखांचा गंडा ; अशी झाली फसवणूक?

सप्टेंबर 18, 2026 9:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नागरिकांना वेगवेगळ्या प्रलोभनांतून गंडवण्याचे प्रकार वाढत असतानाच, पाचोऱ्यातील एका फूल विक्रेत्याला नोकरी लावण्याचे तसेच नगरपालिका ठेकेदारीच्या कामात पैसे गुंतवल्यास दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल २३ लाख ८३ हजार रुपयांची चुना लावला गेला आहे.या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

नेमका प्रकार काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्दी बुद्रुक (ता. पाचोरा) येथील फूल विक्रेते शाम श्रीराम जाधव (वय ३२) यांची पाचोरा शहरातील तलाठी कॉलनी परिसरातील जितेंद्र महारू आहिरे याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आहिरे याने जाधव यांचा विश्वास संपादन केला.

आरोपीने जाधव यांना, “मी गोशाळेला शासकीय मान्यता मिळवून देतो आणि तुम्हाला तेथे नोकरीला लावतो. तसेच माझे मामेभाऊ राजीव शिवाजी वाघ (रा. चाळीसगाव) हे चाळीसगाव नगरपालिकेत मोठ्या पदावर असून, ते नगरपालिका ठेके घेतात. त्या कामासाठी त्यांना पैशांची गरज असून, तुम्ही पैसे गुंतवल्यास दामदुप्पट करून देऊ,” असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या आश्वासनावर विश्वास ठेवून शाम जाधव यांनी २३ जानेवारी २०२३ ते १७ मे २०२४ या कालावधीत आरोपीला वेळोवेळी रोख रक्कम तसेच ऑनलाइन बँक खात्यावरून एकूण ११ लाख ८३ हजार रुपये दिले.

दरम्यान, आरोपीने आणखी एक पाऊल पुढे टाकत “मला लग्नाला जायचे आहे,” असे कारण सांगून जाधव यांची १२ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (एमएच-४८ बीएच-८६००) कार घेतली. मात्र, कार घेऊन गेल्यानंतर ती परत केली नाही.

पैसे आणि कार परत मिळत नसल्याने जाधव यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपली एकूण २३ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून जितेंद्र महारू आहिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now