बोदवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; ६० रेकॉर्डवरील आरोपी तपासले, ४२ संशयित दुचाकी रडारवर

सप्टेंबर 4, 2026 2:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी बोदवड पोलिसांनी आज शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत तब्बल ६० रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ आरोपी आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत १० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात असून ४२ संशयित मोटारसायकलींची तपासणी करण्यात आली. या विशेष मोहिमेत २ उपविभागीय पोलीस अधिकारी, ८ पोलीस अधिकारी, १३० पोलीस अंमलदार आणि आर.सी.पी. पथक सहभागी झाले होते.

bdw

६० आरोपींची तपासणी; तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी बोदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी केली. एकूण ६० आरोपींची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३ आरोपी आढळून आले. या तिघांविरुद्ध कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

अवैध दारूविक्रीवरही पोलिसांचा छापा

पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधातही कारवाई केली. या कारवाईत ५५ लिटर गावठी दारू आणि ६६ नग देशी दारूच्या बाटल्या असा एकूण १० हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई सुरू आहे.

४२ संशयित मोटारसायकली पोलिसांच्या रडारवर

कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांना ४२ संशयित मोटारसायकली आढळून आल्या. या वाहनांची कागदपत्रे आणि मालकी हक्काची तपासणी सुरू आहे. तसेच आर.टी.ओ. विभागामार्फत वाहनांची पडताळणी केली जात आहे. अनियमितता आढळल्यास संबंधित वाहनधारकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कारवाया सुरूच राहणार

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे, अवैध व्यवसायांना आळा घालणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी अवैध दारूविक्री, अंमली पदार्थांची विक्री, जुगार किंवा अन्य कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना तात्काळ द्यावी. नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना सहकार्य करावे आणि माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील, परि. उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह ८ पोलीस अधिकारी, १३० पोलीस अंमलदार आणि आर.सी.पी. पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now