जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड-जामनेर मार्गावरील शेलवड घाटात एक भीषण दुर्घटना घडली. गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका चारचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भोरलाल रतनसिंग दोईया (२६, पिपराना मोहल्ला, नेपानगर, जि. बन्हाणपूर) असे या ठार झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत बोदवड पोलिसांत पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भोरलाल दोईया हा दुचाकीवरून बोदवडहून आपल्या घरी परतत होता. शेलवड घाटात समोरून भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर भोरलाल याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात होताच चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये ६ लाख ६७ हजार ७६० रुपयांचा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला बेकायदेशीर पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. चारचाकीचा चालक अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी मृत भोरलाल यांचा भाऊ रतनसिंग दोईया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बोदवड पोलिस करीत आहेत.










