जळगाव लाईव्ह न्यूज । आशा वर्कर्स लेडीज, नवीपेठ, जळगाव येथे ८ ऑगस्ट रोजी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत झालेल्या या सत्राला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या सत्रात प्रियदर्शनी भांडारकर आणि खुशबू लांबोळे यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्डचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच बनावट लिंक आणि क्यूआर कोड स्कॅमपासून सावध राहण्याबाबत माहिती देण्यात आली.

यासोबतच सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे आणि मोबाईल ॲप्स डाउनलोड करताना घ्यावयाची काळजी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
संवादात्मक पद्धतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात सहभागी व्यक्तींनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली. ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्पही उपस्थितांनी केला.
या उपक्रमासाठी आशा वर्कर्स लेडीज, नवीपेठ, जळगाव येथील उपस्थितांचे मोलाचे सहकार्य लाभले.












