जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील बिबा नगर परिसरात एका घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी संबंधित घरावर छापा टाकून दोन महिला आणि एका तरुणाला ताब्यात घेतले.

गेल्या दोन महिन्यांपासून या घरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले होते. घरात महिला तसेच काही पुरुषांची वारंवार ये-जा होत असल्याने नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय पद्धतीने माहितीची खातरजमा करून संबंधित घरावर कारवाई केली.

पोलिसांनी छापा टाकल्यानंतर दोन महिला आणि एका तरुणाला ताब्यात घेतले. भरनागरी वस्तीमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांच्या पुढील तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येणार आहे.











