अमळनेर

अमळनेच्या तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई; नेमकं कारण काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील वाळू घाटावर नियमबाह्य पद्धतीने मशीनच्या माध्यमातून बेसुमार वाळू उपसा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश गुरुवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

सावखेडा येथील वाळू घाटावर २६ मे रोजी मशीनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे महसूल व पोलिस प्रशासनाच्या कारवाईत उघडकीस आले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सावखेडा मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांना तत्काळ निलंबित केले होते.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना देण्यात आले होते. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अमळनेर आणि चोपडा तहसीलदारांबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी मे महिन्यातच तहसीलदारांवरील कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमामुळे कारवाईला विलंब झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चोपडा तहसीलदारांवरही कारवाईची शक्यता

अमळनेरचे तहसीलदार सुराणा यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर काय कारवाई होते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. सावखेडा वाळू उपसा प्रकरणात यापुढे आणखी कोणावर कारवाई होते, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button