मुक्ताईनगरातील ट्रॅव्हल्समधील डिझेल चोरीचा उलगडा, भिवंडीतील दोन आरोपी जेरबंद

ऑगस्ट 2, 2026 12:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुक्ताईनगर शहरातील ट्रॅव्हल्स बसमधून 340 लिटर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा मुक्ताईनगर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात भिवंडी येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन, 210 लिटर डिझेल आणि विशेष उपकरणांसह 5 लाख 20 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

arrested

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै रोजी सरस्वती नगर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक दिनेश बाविस्कर यांच्या एकवीरा ट्रॅव्हल्स (एमएच-19/सीवाय-2277) या बसच्या डिझेल टाकीचे झाकण तोडून अज्ञात चोरट्यांनी 340 लिटर डिझेलची चोरी केली होती. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढला. त्यानुसार घोडसगावजवळील राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून आयशर वाहन (एमएच-04/डीके-7170) ताब्यात घेण्यात आले.

वाहनातील रईस हासीम शेख (वय 42) आणि मुकेश सुकलाल पवार (वय 40, दोघे रा. भिवंडी, जि. ठाणे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी डिझेल चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीचे डिझेल साठवण्यासाठी बनावट लोखंडी टाकी बसविण्यात आल्याचे उघड झाले. या टाकीतून 210 लिटर डिझेल, डिझेल उपसण्यासाठी वापरण्यात येणारी मोटार आणि नळी जप्त करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत 5 लाख 20 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशी सुरू असून, राज्यातील इतर भागांतील डिझेल चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now