बोदवडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दोन हॉटेल्स फोडून दारूसह रोख रक्कम लंपास

जुलै 21, 2026 4:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड शहरात चोरट्यांनी धाडसी चोरीची मालिका घडवत मलकापूर रोडवरील दोन हॉटेल्स आणि एका वॉशिंग सेंटरला लक्ष्य केले. या चोरीत विदेशी मद्य, बिअर, रोख रक्कम तसेच अन्य साहित्य असा मोठा ऐवज लंपास करण्यात आला. या सलग चोरीच्या घटनांमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

chalisgaon gharfodi 44 thousand

चोरट्यांनी प्रथम मलकापूर रोडवरील हॉटेल प्रकाश येथे मागील बाजूच्या शटरचे कुलूप तोडून प्रवेश केला. हॉटेलमधून विविध विदेशी मद्याच्या बाटल्या, सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर, हार्डडिस्क आणि गल्ल्यातील सुमारे ३५ हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे ८० हजार २७० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या हॉटेल सुनीलला लक्ष्य केले. एक्झॉस्ट फॅनच्या जागेतून आत प्रवेश करून त्यांनी सुमारे १० हजार रुपयांची विदेशी दारू लंपास केली. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात या हॉटेलमध्ये झालेली ही दुसरी चोरी असल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

याच परिसरातील पांडुरंग वॉशिंग सेंटरमधूनही चोरट्यांनी काही किरकोळ साहित्य चोरून नेले. सलग तीन ठिकाणी चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

सोमवारी सकाळी चोरीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिष लवंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ अग्रवाल यांनीही घटनास्थळी जाऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now