भुसावळ पालिकेत पुन्हा खळबळ! भाजप नगरसेविकाचा जातीचा दाखला रद्द

जुलै 16, 2026 1:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपूर्वी भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांचा जातीचा दाखला रद्द करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, आता भुसावळ नगरपालिकेला आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ८ ‘अ’च्या भाजप नगरसेविका अनिता सतीश सपकाळे यांचा ‘अनुसूचित जमाती (टोकरे कोळी)’ जातीचा दावा धुळे येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीने अवैध ठरवत त्यांचा जात दाखला रद्द केला आहे. या निर्णयामुळे भुसावळातील भाजपच्या राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

Anita Sapkale

अनिता सपकाळे यांनी भाजपच्या उमेदवारीवरून प्रभाग ८-अ मधून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जमाती (टोकरे कोळी) जात वैधता प्रमाणपत्रासाठी धुळे येथील जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, समितीने केलेल्या सखोल चौकशीत आणि पोलिस दक्षता पथकाच्या तपासात अनेक गंभीर विसंगती आढळून आल्या.

तपासादरम्यान अर्जदाराच्या वडिलांच्या १९७० सालच्या शालेय दाखल्यात ‘हिंदू सूर्यवंशी कोळी’, तर काकांच्या १९७८ च्या शालेय नोंदीत ‘हिंदू ओबीसी’ असा उल्लेख असल्याचे समोर आले. या नोंदी अर्जदाराने केलेल्या ‘टोकरे कोळी’ अनुसूचित जमातीच्या दाव्याशी विसंगत असल्याचे समितीने नमूद केले आहे.

समितीने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, ‘सूर्यवंशी कोळी’ ही जात १९९५ पासून विशेष मागास प्रवर्गात (SBC) समाविष्ट झाली असून त्यापूर्वी ती इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात होती. ही जात कधीही अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट नव्हती. त्यामुळे उपविभागीय अधिकारी, जळगाव यांनी १ सप्टेंबर २०२३ रोजी जारी केलेले ‘टोकरे कोळी’ जातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धुळे येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष प्रदीप पोळ, सदस्य सचिव स्नेहल गोवेकर आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी निलय राठोड यांच्या त्रिसदस्यीय समितीने हा निर्णय दिला आहे.

या निर्णयामुळे खोट्या अथवा विसंगत कागदपत्रांच्या आधारे राखीव जागांचा लाभ घेणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now