जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ.वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, जळगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे व मैदानी स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात प्रथम त्यांच्या प्रतिमेस प्रो.वैजयंती असोदेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक गुणवत्तेला वाव मिळावा, या उद्देशाने महाविद्यालयात विविध मैदानी खेळांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या. यामध्ये १०० मीटर धावणे , स्टँडिंग ब्रॉड जंप आणि शटल रन यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला.

या प्रसंगी प्रा. चंद्रकांत डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण आणि शिस्त निर्माण होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. चंद्रकांत डोंगरे व क्रीडा विभाग कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले, सदर संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट व सुरेख सूत्रसंचालन प्रो.शिवानी महाजन यांनी केले.









