टायर फुटल्याने मजुरांनी भरलेली आयशर पलटी; यावल-फैजपूर रस्त्यावरील भीषण अपघात!

जुलै 6, 2026 4:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२६ । यावल-फैजपूर महामार्गावरील सांगवी-हिंगोणा गावांदरम्यान आज, सोमवारी (६ जुलै २०२६) सकाळी एक भीषण अपघात घडला. शेतमजुरीसाठी आदिवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाचा पुढील टायर अचानक फुटल्याने वाहन रस्त्यावरच उलटले. या दुर्घटनेत वाहनातील तब्बल २५ आदिवासी मजूर जखमी झाले असून जखमींना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

faizpuryawalroad acd

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातपुडा पर्वतीय परिसरातील कुंड्यापाणी येथील आदिवासी मजूर सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास न्हावी परिसरातील शेतात कामासाठी जात होते. हे सर्व मजूर आयशर वाहनात (क्र. एमएच ४३ बीबी १२६४) प्रवास करत असताना, सांगवी आणि हिंगोणा गावांच्या दरम्यान अचानक वाहनाचा पुढचा टायर फुटला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि आयशर महामार्गावरच पलटी झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व २५ जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे आणि त्यांच्या पथकाने जखमींवर तातडीने उपचार सुरू केले.जखमींपैकी सुमारे १५ जणांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित सुमारे १० जणांवर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

जखमी मजुरांची नावे:

जगन पावरा, शहनाज तडवी, आसिफ तडवी, राधा पावरा, शितल पावरा, मेहंदी पावरा, खेमा पावरा, महिमा पावरा, मंगला पावरा, अनिता पावरा, विराज पावरा, नजरुद्दीन तडवी, मीना पावरा, विरूलाल पावरा, गिरा पावरा, सुनिता पावरा, वाकी पावरा, हुरी पावरा आणि इतर मजूर.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now