जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२६ । गेल्या अनेक दिवसांपासून कडक उन्हाच्या झळा आणि तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळणाऱ्या जळगावकरांना रविवारी बदललेल्या हवामानामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी ढगाळ वातावरणामुळे तापमानात लक्षणीय घट नोंदवली गेली. रविवारी जळगावचे कमाल तापमान ४०.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

ऊन-सावल्यांचा खेळ आणि तापमानात घट
दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यात आज, सोमवारी सकाळपासूनच ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० जून दरम्यान जळगावच्या कमाल तापमानात आणखी २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक दिवसांनंतर जिल्ह्याचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली येण्याचा अंदाज आहे.

पारा घसरणार, पण उकाडा कायम राहणार!
तापमानात घट होणार असल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांपासून नक्कीच आराम मिळेल; मात्र, हवामानातील आर्द्रता (ह्युमिडिटी) वाढल्यामुळे नागरिकांना असह्य उकाड्याचा (दमटपणा) त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे तापमान कमी होऊनही काही दिवस घामाच्या धारा कायम राहतील.
२१ जूननंतर मान्सूनची दमदार एन्ट्री?
जळगावकरांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे, काही काळ रेंगाळलेल्या मान्सूनची वाटचाल आता पुन्हा गतीने सुरू झाली आहे. अनुकूल वातावरण तयार होत असल्याने २१ ते २८ जून दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात मान्सूनच्या दमदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे.








